मी अगदी नियमित लिहितो. अनेक मित्र माझ्या पोस्टवर व्यक्त होतात. माझ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करतात. परंतु कवी, लेखक राजकीय पोस्टकडे वळून बघत नाहीत. आणि ज्यांना राजकारणात रस आहे, ते साहित्यिक आणि वैचारिक पोस्टकडे ढुंकून बघत नाहीत. असं का?
अनेकांना आपण का लिहितो हेच माहित नसतं. जुनं साहित्य काळाच्या उदरात गडप होणार आहे. त्यामुळे नवीन साहित्य यायला हवं. पण कशासाठी? अनेकांना केवळ आपली ओळख निर्माण करायची असते. काहींना स्वतःवर कवी, गझलकार हा शिक्का हवा असतो. परंतु आपलं लेखन समाजाला काय देणार आहे, याचा विचार कितीजण करतात? माझं लेखन समाजाभिमुख नसेल तर मी लिहायचं कशाला?
पाच ते पंचवीस या वयोगटातील तरुणांनी माझं लेखन वाचावं, अशी माझी प्रामाणिक इच्छा असते. म्हणजे पंचवीस वर्षांपुढील व्यक्तींनी ते वाचू नये असं नाही. परंतु पंचविशीपर्यंत वैचारिक बैठक पूर्णतः तयार झालेली असते. वाचन करून ती बदलण्याची शक्यता मावळलेली असते. परंतु पाच ते पंचवीस हे वैचारिक बैठक तयार होण्याचं. त्यामुळेच या वयोगटापर्यंत माझं लेखन पोहचत असेल. त्यांना वैचारिक दिशा देण्यात माझं लेखन यशस्वी होत असेल तरच मला आनंद आहे.
मित्रांनो तुमची मुलं, तुमची नातवंड अवांतर वाचन करत नसतील तर काहीतरी चुकतंय हे लक्षात घ्या. पूर्वी लहान मुलांच्या हाती पुस्तकं दिसायची. मूल दोन तीन वर्षाचं झालं कि, त्याच्यासाठी सचित्र कॅलेंडर आणलं जायचं. भिंतीवर टांगलं जायचं. रंगीत चित्र आणि बाराखडी असणारी पुस्तकं मुलांच्या हातात दिली जायची. 'अ अ, अननसचा, आ आ आईचा' म्हणत आई त्याला शिकवायची. चित्रं दाखवून घोडा, बैल, मांजर, कुत्रा, उंदीर, मोर, बदक यांची ओळख करून द्यायची.
परंतु आज डबा करून ऑफिसला निघण्याच्या गडबडीत असणारी आई हे करू शकत नाही. मग कसं होणार मुलांचं? मुलं घडणार कशी? अलीकडे वर्षभराच्या मुलाच्या हातात सुद्धा मोबाईल दिसतो आणि ते लहानगं जेव्हा मोबाईलच्या स्क्रिनवर बोट नाचवतं तेव्हा आई बाबा हरखून जातात. परंतु त्या वयात मुलांनी पुस्तक हाती घ्यायला हवं. आजी आजोबांच्या मांडीवर झोपून पऱ्यांच्या, राजपुत्राच्या गोष्टी ऐकायला हव्यात. आजी आजोबा नसतील तर मुलांना गोष्टी सांगण्याची जबाबदारी आई वडिलांची आहे. पण मुलांनी टिव्ही, मोबाईल मध्ये रममाण होणं धोक्याचं आहे. त्यांनी पुस्तकात रमायला हवं.कारण पुस्तकं जसे संस्कार करतील तसे संस्कार मोबाईलचा अथवा टिव्हीचा स्क्रिन, सिनेमाचा पडदा नाही करू शकत.
मुलाच्या समोर मोबाईल ठेवायचा अथवा टिव्ही सुरु करून मुलाला त्यासमोर ठेवायचं आणि आईने कामात रमायचं हे चित्र प्रत्येक घरात दिसतं. मुलं कार्टून मध्ये रमतात. परंतु अनेक मालिका मुलांवर योग्य संस्कार करण्यास सक्षम नाहीत. शिनचॅन्ग हि मालिका उदाहरण म्हणून सांगता येईल. तो टिचभर मुलगा ज्या रितीने, उर्मटपणे वागतो, बोलतो त्यातून काय घ्यायचं. रांगणाऱ्या मुलाच्या हातात पुस्तक पडायला हवं. गरज पडल्यास त्यांच्या कानाशी मोबाईल नव्हे खुळखळा वाजायला हवा. योग्य वयात त्यांनी अवांतर वाचायला हवं. एकदा त्याला पुस्तकाचं वळण लागलं कि, 'अवांतर वाचन करत जा कि जरा' हे त्याला सांगण्याची गरज पडणार नाही. पण तुमची मुलं अवांतर वाचन करत नसतील, पुस्तकात रमत नसतील तर ती धोक्याची घंटा समजा.
No comments:
Post a Comment