Sunday, 21 June 2020

बापाने धृतराष्ट्र होण्याचे सोंग घेतले तर...


vijay shendge images

ज्यांनी राहुल गांधी यांचा नवीन लूक पाहिला असेल त्यांना काय जाणवले कोणास ठाऊक. परंतु मला मात्र राजीव गांधी यांचा मेकओव्हर करण्याचा प्रयत्न केलेला असं जाणवलं. किती वाईट हे! गुण अंगभूत असतात, अंगावरचा
पेहराव बदलून माणसाचे गुण कसे बदलता येतील? गाढवाच्या पाठीवर घोड्याचं खोगीर ठेवून घोडे सवारीची अनुभूती कशी घेता येईल? बाप कितीही मोठा असो. परंतु मुलांना स्वतःची ओळख निर्माण करता यायला हवी. स्वतःच विश्व निर्माण करता यायला हवं. बापाने आणि पूर्वजांनी निर्माण केलेल्या सावलीत मुलं वाढणार असतील तर काय उपयोग?  गरुडाच्या पिलाने त्याच्याहून उंच झेप घेतली तरच गरुडाला आनंद होईल ना.

पिलांच्या पंखात बळ भरणं हे प्रत्येक पित्याचं कर्तव्य आहे. परंतु पिलाला जबाबदारी कळत नसेल तर आईने त्याला पंखाखाली घेऊन बसू नये आणि वेळ काळ पाहून पित्याने पिलाला खुशाल फांदीवरून ढकलून द्यावं. पंख फडकवत ते नक्की झेप घेईल. तसं नाही झालं तर योग्य वेळी आधार द्यावा. पुन्हा फांदीवरून ढकलुन द्यावं. एक ना एक दिवस ते झेप घेईल. तेव्हाच आपल्या बाप असण्याला अर्थ प्राप्त होईल.

मुलाचं यौवन मागणारा ययाती जसा आदर्श नव्हे, तसेच जबाबदारीने न वागणारी मुले सुद्धा कुचकामीच. परंतु मुलं कुचकामी ठरली तर तो दोष पालकांचाच मुलांचा नव्हे. अलीकडे शिक्षकांनी मुलांना एखादी चापट मारली तरी शाळेत जाऊन शिक्षकांना जाब विचारणारे पालक आणि अशा घटनांना प्रसिद्धी देणारे पत्रकार बघून आश्चर्य वाटते. बापाने धृतराष्ट्र होण्याचे सोंग घेतले तर मुलांच्या नशिबी कौरवांचे अपयश येण्याची शक्यता उरते दुसरे काहीही हाती लागू शकत नाही. 

कालचीच घटना, मी माझ्या भाच्याला सांगत होतो, "एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आयुष्यात तू कोणावरही चिडलास तरी चालेल पण आई-बाबांवर कधी चिडायचं नाही." अर्थात त्याचे आई-वडील कर्तृत्ववान आहेत म्हणून हे मी सांगू शकलो. आई बाप जबाबदारी ओळखून वागत नसतील तर मुलांना दोष देण्यात काय अर्थ आहे. परंतु चिमण्या पावलांना बळ देणाऱ्या पालकांची जबाबदारी मोठे झाल्यावर मुलांनी घ्यायला हवीच. अलीकडे तर मुलांनी पालकांना सांभाळायला हवं असा कायदा सुद्धा केला आहे. नातं टिकवण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याची वेळ येत असेल तर ते सर्वाधिक दुर्दैवी होय.

' आई महान कि बाबा थोर ' या वादात नाही पडायचं मला. मुलाला नऊ महिने पोटात वाढविणाऱ्या, जीवघेण्या वेदना सोसून जन्म देणाऱ्या आईचे या जगात खुप गोडवे गायले जातात. पण आयुष्यभर मुलांच्या भवितव्याचा विचार करणारया, त्यासाठी कष्ट उपसणाऱ्या, त्यासाठीच नको इतक्या खस्ता खाणाऱ्या , मुलाच्या चिंतेने रात्र-रात्र तळमळणारया बाबाविषयी मात्र कोणीच काही बोलत नाही.त्या बाबासाठी हि कविता. कविता जुनी असली तरी वरील गद्य प्रासंगिक आहे. ज्यांनी कविता यापूर्वी वाचली नसेल त्यांनी कवितेचा सुद्धा आनंद घ्यावा.

बाबा …….

मरण यातना सोसताना,
आई जन्म देत असते
आपलं हसू पाहताना,
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्रं हसत हसत,
दिवस रात्रं खपत असतो
शिस्त लावत आपल्यामधला,
हिरवा अंकुर जपत असतो

त्याला कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसे भरत असतो

तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडे पहात नाही

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्न
तुम्ही म्हणजे त्याचं आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ

तुमच्याकडून तसं त्याला
काहीसुद्धा नको असतं
तुमचं यश पाहून फक्त
त्याचं पोट भरत असतं

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता देता तरी
मन मारून हसत असतो.

त्याच्या वेदना आज कधी
कुणालाही कळणार नाही
आज त्याला मागितल्या तर
मुळीसुद्धा मिळणार नाहीत

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल' " आपला बाबा
खरंच कधी चुकत नव्हता.
आपल्यासाठी आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होता. "

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्याचा
तुमच्या हातात घट्ट धरा
…………

थरथरणारा हात त्याचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

- विजय शेंडगे , पुणे

8 comments:

 1. माँ के बिना

  पूरा घर बिखर

  जाता हैं

  लेकीन पिता के बिना

  पुरी दुनिया बिखर जाती

  हैं


  नशिब वाले होते हैं

  जिनके सर पर पिता का

  हात होता हैं..

  जिध्द भी पूरी होती हैं


  अगर पीता का साथ

  होता हैं...👨🏻🙏👍

  ReplyDelete
 2. अप्रतिम कविता आणि विचार

  ReplyDelete
  Replies
  1. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.

   Delete
 3. आज खूप दिवसातून ब्लॉग पहिला खूप मस्त विषय मांडणी

  ReplyDelete
  Replies
  1. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.

   Delete
 4. सुंदर कविता व मार्मिक लेख.

  ReplyDelete
 5. सुंदर कविता बा पा शिवाय जीवन अधूरे आहे ��������������������

  ReplyDelete