माझ्या मुलाला लॅपटॉप घ्यायचा आहे. 'बॅन चायना', 'स्वदेशी' अशा घोषणा सुरु आहेत. प्रत्येकाच्या मनात चायनाविषयी राग आहे. त्यालाही चायनाचा खूप राग आहे. त्याने सर्च घेतला. भारतीय बनावटीचा लॅपटॉप उपलब्ध नाही. चायनाचा लॅपटॉप घ्यायचा नाही म्हटलं तर,
त्याच्यासमोर अवघे एकदोन पर्याय उरले. शेवटी मनात नसतानाही चायना मेक असलेला लॅपटॉप घ्यायचं ठरलं. घोषणा देणं सोपं आहे. परंतु चायनाच्या तंत्रज्ञानाला आव्हान देऊ शकेल असं तंत्रज्ञान आम्ही उभारलं आहे का? त्यांच्या किंमतीला आव्हान देईल अशा किंमतीत आम्ही वस्तू उपलब्ध करून देऊ शकतो का? मग आमचे उद्योजक काय करतात? पवार साहेबांना म्हणावं ती बारामती ऍग्रो बंद करा आणि सुरु करा ना मोबाईलचे उत्पन्न. चार सहा साखर कारखाने बंद करून लॅपटॉपचे उत्पादन सुरु करा ना? पण ते अशा कंपन्या सुरु करणार नाहीत. ते फक्त शिक्षण संस्था जन्माला घालतील. आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण तयार करून सोडून देतील.
एखादा मुलगा पहिला येणं यात कोणत्याही शिक्षकाचं फारसं कौशल्य नसतं. त्या मुलाचा बुध्यांकच जास्त असतो. आकलन शक्ती चांगली असते. आणि एखादा मुलगा नापास होणं यातही शिक्षकाचा फारसा दोष नसतो. मुळात शिक्षक येतात. शिकवतात घरी निघून जातात. मुलांच्या डोक्यात किती शिरलं आहे हे ते तपासू शकत नाहीत. मुळात तशी गरजही नसते. मुलं पास झाली काय आणि नापास झाली काय, कोणत्याही शिक्षकाचा पगार कमी होत नसतो. वेळेनुसार येणारं प्रमोशन थांबत नसतं.
अलीकडे तर शिक्षकी पेशा हा सर्वात सुखाचा धंदा झाला आहे. मूल्यांकन नाही, काही नाही. पालकांना काळजी असतेच. ते योग्यवेळी मुलांना खाजगी क्लास लावतात. परंतु क्लास लावल्याने मुलाच्या गुणवत्तेत फार मोठा फरक पडतोच असं नाही. हो, पण शिकवणारी व्यक्ती चांगली असेल तर नापास होणारा मुलगा पास होऊ शकतो. नव्वद टक्के नाही मिळवू शकत. त्यामुळे आई वडिलांनी दोघांनी जॉब करण्यापेक्षा, एकाने नौकरी सोडून मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तर किती उत्तम होईल!
प्रॅक्टिकल वगैरे काही खरं नसतं. अनेक शाळांमध्ये अद्यायावत लॅब नाहीत. प्रशिक्षित स्टाफ नाही. अमेरिकी, सौदी अरेबिया, मलेशिया अशा जगभरातील विविध देशात १.५ कोटी भारतीय तरुण नौकऱ्या करतात. भारतात प्रचंड परकीय चलन पाठवतात. हे तरुण तिथे कोणत्याही आरक्षणाच्या अथवा वशिल्याच्या बळावर गेलेले नाहीत. त्यांनी झेप घेतली ती केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि परिश्रमाच्या बळावर. पण असे तरुण किती हजारात एक. ते शिकतात आणि दुसऱ्या देशात निघून जातात. कारण त्यांच्या बुद्धिमत्तेला या देशात न्याय मिळत नाही. या देशातल्या व्यवस्थेला केवळ लाळघोटे हवेत. 'होय साहेब' म्हटले तर तुमची प्रगती. काम करण्याची, कार्यक्षमता दाखवण्याची गरज नसते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हटले कि आम्हाला परदेशी तंत्रज्ञानाकडे बघावे लागते.
'छडी वाजे घमघम, विद्या येई छमछम' हे गाणं कालबाह्य झालं आहे. मुलांचा कान धरायचा म्हटलं तरी कायद्याच्या कक्षेत बसेल कि नाही याचा विचार करावा लागतो. पूर्वीच्या झोकून देऊन शिकवणाऱ्या शिक्षकांना, मुलांना मारण्याचा अधिकार होता. पण अलीकडच्या पाट्या टाकू शिक्षकांनी तो हक्क गमावला आहे. आमची शिक्षण व्यवस्था बुद्धिमान मुले घडवायला अपयशी ठरते आहे. ती केवळ गाढवे जन्माला घालते आहे असं म्हणावं लागेल.
No comments:
Post a Comment