माझेच एक मित्र आहेत. माध्यमिक शिक्षक आहेत. एक दिवस असाच आमचा फोन झाला म्हणालो, "अमके अमके पुस्तक वाचले का?"
त्यावर ते म्हणाले,
"सर मी शाळेत नौकरीला लागल्यापासून एकही पुस्तक वाचले नाही. उपयोग काय ते वाचून. वाचलेलं कामाला येत नाही हो. कमावलेला पैसाच उपयोगी पडतो. आता समजा उद्या मला काही व्याधी जडल्या तर मी वाचलेले कामाला येईल कि मी कमावलेला पैसा उपयोगी पडेल?"
मी निरुत्तर झालो होतो असे नव्हे. परंतु त्या व्यक्तीसमोर युक्तिवाद करून उपयोग नव्हता हे माझ्या लक्षात आले होते. परंतु मला प्रश्न पडला हा माणूस मुलांवर कोणते संस्कार करत असेल? त्यांना काय शिकत असेल? असले शिक्षक घडवणे हे आमच्या शिक्षण व्यवस्थेचं, निवड समितीचं अपयश नाही का? निवड समिती, गुणवत्ता आणि मुलाखती याला शून्य किंमत आहे. शिक्षक व्हायचं आहे. ५ लाख द्या, क्लार्क व्हायचं आहे ४ लाख द्या, शिपाई व्हायचं आहे ३ लाख द्या. काही दिवसापूर्वी तर माझ्या मित्राने ओपन ऑफर दिली होती, साहेब १० कोटी द्या एखाद्याला हव्या त्या जागेवर कलेक्टर म्हणून बसवतो.
पुस्तकंसंस्कार करतात. हे कसे लक्षात येत नाही कुणाच्या / अर्थात पुस्तकांनी संस्कार करायचे असतील तर त्यासाठी ती मन लावून वाचायला हवीत. आपण बीजगणित शिकतो, त्यात संच शिकतो, पदावली शिकतो, ट्रिग्नॉमेट्री शिकतो, आलेख शिकतो, बारावीच्या गणितात, डिफरंशिअल इक्वेशन, इंटिग्रेशन, डिटर्मिनन्ट शिकतो. वास्तव जीवनात यातल्या कशाचाही उपयोग होत नाही. मग शिक्षणात याचा अंतर्भाव का केलेला असतो. असा प्रश्न अनेकांना पडतो. मला वाटते गणित हा विषय आपल्या बुद्धीला चालना देण्याचे काम करतो. विचारशक्तीला वळण लावतो. आणि केवळ त्याच हेतूने गणितात वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर केलेला असतो.
आज मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत. पुस्तकांपासून, वाचन संस्कृतीपासून दुरावली आहेत. आणि अशा वेळी नॉन ग्रॅज्युएट रोहित पवार म्हणतो कि मुलांना ऑनलाईन शिक्षण द्यायला हवे. माझ्या मतदार संघांमध्ये ६० % पालकांकडे अँड्रॉइड बेस मोबाईल आहेत. टेक्नॉलॉजी गेली खड्ड्यात. मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याची वेळ आली आहे. परंतु यावर पालकांपासून, शिक्षकांपर्यंत प्रत्येकाने ठाम असायला हवे. मुलांना घडवणं हि सर्वाधिक जबाबदारी पालकांची आहे. त्यानंतर शिक्षकांचा क्रम लागतो हे वास्तव असले तरी. आमच्या बाईंनी सांगितले, आमच्या सरांनी सांगितले म्हणत आई वडिलांना सुनावणारी मुले प्रत्येक घरात असतात. त्यामुळेच आधी सक्षम, सुसंस्कृत, सुविद्य शिक्षक घडवले गेले पाहिजेत. तरच सुसंकृत पिढी आकाराला येईल.
No comments:
Post a Comment