आजवर जे काही राजकीय नेते होऊन गेले त्यात. सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि बाळासाहेब ठाकरे हे सर्वश्रेष्ठ. नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांना दुसऱ्या फळीत टाकता येईल. मग कोणी प्रश्न विचारेल आमच्या साहेबांचं, शरद पवारांचं काय?
शरद पवारांना जाणता राजा हि उपाधी कोणी दिली माहित नाही. परंतु देवतेचे चित्र रेखाटताना लाल, पिवळ्या रंगाचा वापर करून जसं तेजोवलय दाखवलं जात, तसं शरद पवारांना वेगवेगळ्या उपाध्या बहाल करून शरद पवारांच्या भोवती महानतेचं वलय निर्माण करण्यात आलं आहे. अन्यथा शरद पवार हे राज ठाकरे, ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू यांच्या पातळीवरील नेते. आपला स्वार्थ हे प्राधान्य. त्यासाठी संधी मिळेल तेव्हा पक्ष फोडणे, तत्व गुंडाळून मनात येईल त्या पक्षाशी हातमिळवणी करणे. लोकांना आमिषे दाखवून आपल्या गोटात ओढणे याला कर्तृत्व कसे म्हणता येईल?
शरद पवार यांचे मोठे बंधू भारतीय शेतकरी कामगार पक्षात होते. परंतु त्या पक्षात जाऊन हाताला काही लागणार नाही. राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस पार्टीशी आपण लढा देऊ शकणार नाही. याची जाणीव असल्यामुळे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसल्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस पक्षात जाणे पसंत केले. यशवंतराव चव्हाण यांचं बोट धरून शरद पवार मोठे झाले. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जसे अनेकजण मोदी या नावाच्या वलयामुळे विजयी झाले. त्यावेळी काँग्रेसचे वलय तर त्याहीपेक्षा प्रभावी वलय काँग्रेस भोवती होते. त्यामुळे शरद पवार विजयी होणे यात नवल काही नव्हतं.
१९६७ ला आमदार झालेले शरद पवार १९७२ ला पुन्हा आमदार झाले. परंतु १९७५ ला इंदिरा गांधी यांनी देशभर आणीबाणी लागू केली. १९७८ ला आणीबाणी उठवल्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक झाल्या. यशवंतराव चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले. रेड्डी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. इंदिरा काँग्रेस, रेड्डी काँग्रेस आणि जनता दल यापैकी कोणालाही बहुमत मिळू शकलं नाही. सहाजिकच जनता दलाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेस एक झाल्या. काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनी बारा आमदारांना सोबत घेऊन सरकारचा पाठींबा काढून घेतला. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. जनता दलाशी हात मिळवणी केली. पुरोगामी लोकदल आघाडी हा पक्ष स्थापन केला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.
पण इंदिरा गांधी स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. पवारांचे सरकार पदच्युत केले. पुन्हा निवडणुका झाल्या. काँग्रेस बहुमताने सत्तेत आली. शरद पवारांना सहा वर्षे सत्तेशिवाय तळमळत रहावे लागले. १९८४ ला इंदिरा गांधी गेल्या. काँग्रेस आणखी कमजोर झाली. १९८७ ला पवारांनी पुलोद गुंडाळली आणि पुन्हा काँग्रेस मध्ये सहभागी झाले. १९९७ साली त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यपदाची निवडणूक लढवली आणि सीताराम केसरी यांच्याकडून पराभूत झाले. १९९९ ला पवारांनी सोनिया गांधी यांच्या जन्म स्थानाचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसने शरद पवारांची पक्षातून हकालपट्टी केली. मग पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली. या सगळ्या वाटचालीत शरद पवारांचे कर्तृत्व काय?
मग बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांच्याहून दहा पटीने थोर म्हणायला हवेत. स्वबळावर पक्ष स्थापन केला. वाढवला. मोठा केला. सत्ता मिळवली. जे काही केलं ते स्वकर्तृत्वावर. काँग्रेसमधून बाहेर पडून, काँग्रेसचेच आमदार सोबत घेऊन पक्ष स्थापन करणाऱ्या पवारांचं कर्तृत्व काय. २००४ ला मिळालेल्या ७१ जागा हि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सर्वोत्तम कामगिरी. स्वबळावर सत्ता तर सात जन्मात मिळणार नाही. बरं ते ७१ असोत अथवा आजचे पावसात भिजून निवडून आणलेले ५४ असोत. यांच्यावर काँग्रेसी शिक्का आहेच ना. पवारांचे कर्तृत्व काय? तर केवळ दगाबाजी. आणि हेतू काय तर केवळ सत्ता. राजकारण अंगाला लावून न घेता राजकारण करणारे बाळासाहेब पवारांपेक्षा १० पटीने श्रेष्ठ आहेत. म्हणून म्हणालो, 'साहेब एक नूर तर बाळासाहेब दस नूर.'
छानच
ReplyDeleteअगदी बरोबर व सत्य अवलोकन.
ReplyDelete