Tuesday, 16 June 2020

पवार साहेब, तुम्ही जनतेची दशा करण्याचं काम केलं आहे.

vijay shendge images

परवा गावी गेलो होतो. दोन एकर बाजरी पेरली. साडेतीन एकर तूर पेरली. उसाच्या लागवडीची तयारी केली. एक मित्र सांगत होता, "काका, दुधाला फक्त १७ रुपये भाव मिळतो आहे. पाच सहा महिन्यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात तरी बरं होतं.
पण आता फारच वाईट अवस्था झाली आहे. खुराकाचे पैसे सुद्धा सुटत नाही." हा भाव एक लिटरचा बरं का मित्रांनो. फडणवीस सरकारच्या काळात दुधाला २२ ते २७ रुपये भाव होता. त्यावेळेस आजचे सत्ताधारी दुधाला तीस रुपये भाव मिळायला हवा म्हणून दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून देत होते. दुधाचे टँकर रस्त्यावर रिकामे करत होते. आज तुम्ही सत्तेत आहात, मग आता लिटरला २५ / ३० रुपये भाव द्या ना. 

बरं शेतकऱ्यांना भाव कमी आणि शहरात सीलबंद दुधाचे भाव मात्र तसेच. मग मधली मलई कोण खातो? शेतकऱ्याला २५ रु भाव असताना सीलबंद दूध ४५/५० रुपये लिटरने विकले जात असेल तर शेतकऱ्याला ५, ७ रुपये कमी मिळाल्यावर सीलबंद दुधाचे भाव तेवढे कमी का होत नाही? काँग्रेस म्हणते आम्ही धवल क्रांती घडवून आणली, हरित क्रांती घडवून आणली? म्हणजे काय केले हो तुम्ही. दुधाला भाव मिळत नाही म्हणून दूध रस्त्यावर ओतून देण्याची वेळ येते. आणि शेतीच्या आधारावर जगणे जमत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. मग तुम्ही केलेली धवल क्रांती आणि हरित क्रांती गेली कुठे? आता कोणी येते सेंद्रिय शेती करा म्हणते, जैविक शेती करा म्हणते? कसली कसली औषधं देतं, बी-बियाणं देतं, पिकांसाठी टॉनिक दिले जातात, वाढीव उत्पन्नाची हमी दिली जाते. पण आमचा शेतकरी कधीही उत्पन्न मोजत बसत नाही. वाढीव उत्पन्न कधीच मिळत नाही. परंतु आहे त्यापेक्षा कमी उत्पन्न मिळाले तर रोगराई, वातावरण, पाण्याची कमतरता अशी कारणे पुढे केली जातात.  

मी गेली आठ वर्षे शेती करतो आहे. उसाला कशा रीतीने पाणीपुरवठा व्हायला हवा? हे माझ्या लक्षात आलं आहे. परंतु त्यासाठी जी पाच सात लाखाची इनव्हेसमेंट गरजेची आहे, त्यासाठी जे प्रयोग करणे गरजेचे आहे, ते कोण करणार? बरं सगळं करून अपयश आलं तर ते कोणी झेलायचं? शरद पवार दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री होते. कुठले प्रयोग केले त्यांनी? शेतीला कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन दिला? केवळ कर्ज देऊन आणि कर्जमाफी करून शेतकऱ्याला उर्जितावस्था प्राप्त होऊ शकते काय? शेतमालाला बाजारभाव, कमी किंमतीत खात्रीशीर बियाणांची उपलब्धता, पुरेशी सिंचन योजना? या शेतीसाठी गरजेच्या बाबी. यातलं शरद पवारांनी काय केलं? आणि काही मंडळी म्हणतील, तुमच्या प्रत्येक लेखात शरद पवारांना दोष का दिलेला असतो? त्यांना एवढेच सांगेन, शरद पवार राजकारणाचा, मंत्रिपदाचा सर्वाधिक उपभोग घेतलेलं व्यक्तिमत्व आहे. तेच एकदा म्हणाले होते, "मी पन्नास वर्षांपासून राजकारणात आहे . जनतेने मला खूप काही दिले. जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले." 

जनतेने तुम्हाला खूप काही दिले. जनतेने तुमच्यावर खूप प्रेम केले हे तर अगदी उघड आहे. परंतु तुम्ही मात्र जनतेला फसविण्याशिवाय आणि समाजात दुही पसरविण्याशिवाय अधिक काहीही केलेलं नाही हे वास्तव आहे. पवार साहेब तुम्ही जनतेला दिशा देण्याचं नव्हे जनतेची दशा करण्याचं काम केलं आहे.    

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete